10+ छान छान गोष्टी मराठी मध्ये. Kanchan Goshti Collection

Kanchan Goshti

कावळा काळा का?

Kanchan Goshti

Kanchan Goshti

फार काळापूर्वीची गोष्ट आहे, त्याकाळी सर्व पक्षांना पांढराच रंग होता. त्याकाळी जंगलामध्ये मोर, कावळा, घुबड, बगळा, चिमणी, पोपट, बदक, घार, असे अनेक पक्षी राहत होते. पण त्या सर्व पक्षांना पांढर्‍या रंगा शिवाय दूसरा कोणताच रंग नव्हता. सर्व पक्षी पांढर्‍या रंगाचे असल्यामुळे शिकारी सहजपणे त्या सर्व पक्षांची शिकार करू शकत होता, कारण पांढर्‍या रंगामुळे सर्व पक्षी झाडाच्या हिरव्या फांदीतून, पांनातून लगेच दिसत असतं आणि दुरून सुद्धा शिकार्‍याच्या नजरेस पडत त्यामुळे शिकार्‍याला शिकार करणे खूप सोपे जात होते. हळूहळू पक्षांची शिकार मोठ्या प्रमाणात होऊ लागली. रोज थोडे थोडे पक्षी शिकारीमुळे मरण पाऊ लागले. एकेदिवशी सर्व पक्षी एकत्र जमले आणि सर्वजण गणपती देवाकडे गेले आणि त्यांनी आपली सर्व हकीकत गणपतीला सांगितली.

सर्व पक्षांनी गणपतीला म्हटले हे देवा आम्हा सर्वांना एकच पांढरा रंग आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण सहजपणे शिकार्‍याच्या नजरेस पडत आहोत, आणि शिकारी आमची रोज शिकार करू लागला आहे. हा पांढरा रंग आमचा शत्रू होऊन बसला आहे, त्यामुळे देवा तू आम्हा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग दे, म्हणजे आम्ही शिकार्‍याच्या नजरेस पडणार नाही आणि आम्हाला जीवनदान मिळेल. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर गणपतीने त्या सर्वांना एक दिवस नेमून दिला आणि त्या दिवशी सर्व पक्षांना एकत्र येण्यास सांगितले. गणपतीच्या सांगण्यावरून सर्व पक्षी आनंदाने आपल्या आपल्या घरी निघून गेले.

गणपतीने ठरवून दिलेल्या दिवशी सर्व पक्षी गणपती समोर एकत्र जमले. सर्व पक्षी एकत्र येण्याअगोदर गणपतीने सर्व प्रकारचे रंग एकत्र केले होते. सर्वात अगोदर चिमणी पुढे आली आणि गणपतीला म्हणाली, “हे देवा! मी रोज मातीमध्ये दाणे टिपत असते, त्यामुळे तू मला छानसा मातीसारखा भुरकट असा रंग दे, म्हणजे मी कुणाला सहजपणे दिसणार नाही. गणपतीने चिमणीच्या म्हणण्यानुसार चिमणीला भुरकट असा रंग दिला. त्यानंतर पोपट समोर आला आणि गणपतीला म्हणाला “हे देवा, मी हिरव्यागार फांद्यामध्ये राहतो त्यामुळे तू मला हिरवा रंग दे म्हणजे मी कुणाला झाडाच्या फांद्यामधून सहजपणे दिसणार नाही मात्र चोच माझी लाल रंगाची कर कारण मला लाल रंगाची फळे चाखायला आवडतात. गणपतीने पोपटाच्या म्हणण्यानुसार पोपटाच्या पंखाना हिरवा तर चोचीला लाल रंग दिला. पोपटाच्या नंतर घार समोर आली आणि गणपतीला म्हणाली “हे देवा, मी उंच उंच डोंगरामध्ये घिरट्या  घालते त्यामुळे तू मला किरमिजी तपकिरी रंग दे, देवाने घारीला सुद्धा तिच्या म्हणण्यानुसार रंग दिला. सर्व पक्ष्यांच्या आवडीनुसार गणपतीने सर्व रंग वाटून टाकले.

आपल्या आवडीनुसार रंग मिळाल्यानंतर सर्व पक्षी आनंदाने घरी परतले. पण गोष्ट अशी कि त्या सर्व पक्षांनामध्ये फक्त कावळाच आला नव्हता सर्व पक्षांनी कावळ्याला गणपतीकडे जाण्यास सांगितले सर्व पक्षी कावळ्याला म्हणाले अरे लवकर जा नाहीतर सर्व रंग संपून जातील. ज्यावेळी कावळा देवा कडे गेला त्यावेळी थोडेच रंग उरले होते त्यामुळे एक कोणता रंग कावळ्याला देण्यास पुरणार नव्हता मग कावळा देवाला म्हणाला हे देवा सर्व रंग मिळून जो रंग बनेल तो रंग मला दे म्हणजे रंग ही पुरेल आणि मला नवीन रंग ही मिळेल तेव्हा गणपतीने कावळ्याच्या म्हणण्यानुसार सर्व रंग एकत्र केले आणि आश्चर्य म्हणजे त्या मिश्रणातून काळाच रंग तयार झाला आणि देवाने काळा रंग कावळ्याला दिला. कावळा बिचारा नाराज होऊन तिथून निघून गेला, कारण उशिरा येण्याचं फळ त्याला मिळालं होत.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *